मौर्य साम्राज्य
अलेक्झांडरचे आक्रमण काळात मगधमध्ये नंद घराण्याची सत्ता होती. नंद वंशाच्या काळात मगधमध्ये असंतोष व राजकीय अस्थैर्य वाढले होती. चंद्रगुप्त मौर्यने मगध साम्राज्याचे शासक नंद घराण्याचा पराभव केला व इसपूर्व ३२१ मध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्तने अलेक्झांडरचा सेनापती सेक्युलस निकेटरचा पराभव करून ग्रीकांचे वर्चस्व संपुष्टात आणले. चंद्रगुप्त मौर्यने भारताचा मोठा भूभाग मौर्य साम्राज्याचा अधिपत्या खाली आणला, तो विस्तार बिन्दुसारच्या काळात चालू राहिला व सम्राट अशोकच्या काळात (इ.स.पूर्व २७३ ते २३२) त्या विस्ताराने कळस केला. जवळपास संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगणिस्तान, बांग्लादेश, इराण व ब्रम्हदेशाचा काही भाग इतका मोठ्या भूभाग मौर्य साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला होता. इस. २६० मध्ये झालेल्या कलिंगच्या युद्धात अशोकने कलिंग देश मौर्य साम्राज्याला जोडला परंतु झालेली मानवहानी पाहून त्याचे मन विरक्त झाले व त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तसेच त्याने बौद्ध धर्माच्या प्रसारकाचे काम हाती घेतले. बौद्ध धर्माचा जगभर प्रसार होण्यास अशोकाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती. तर विदीशा, उज्जैन, तक्षशिला ही प्रमुख शहरे होती. अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या कानाकोपऱ्यात पहावयास मिळतात, तसेच अनेक स्तूप आजही पहायला मिळतात, सारनाथ येथील अशोकस्तंभ आज आधुनिक भारताची राजमुद्रा बनली आहे. सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्य हळूहळू क्षीण होत गेले व अशोकानंतर ६० वर्षातच लयाला गेले. शेवटचा मौय सम्राट बृहद्त्त याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने वध केला व मौर्य साम्राज्याचा अंत झाला.
शुंग, शक आणि सातवाहन:
मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर उत्तर भारतावर शुंग वंश, पश्चिमेला शक राज्य् व दक्षिणेला सातवाहनांचे प्राबल्य होते. भारताच्या वायव्य प्रांत व अफगणिस्तानवर ग्रीक राज्य कर्त्यांनी पुन्हा वर्चस्व मिळवले परंतु कालांतराने ते भारतीय संस्कृतीत सरमिसळून गेले. मौर्य साम्राज्याचा शेवटचा सम्राट बृहदत्त याचा पुष्यमित्र शुंग ने वध केला व स्वता: सम्राट बनला, त्याच्या राज्यकालात त्याने मागील शतकात बौद्ध धर्माचे वाढलेले प्रस्थ कमी करण्याचा प्रयत्न केला व सनातन वैदिक धर्माला चालना दिली. त्याने अनेक बौद्ध स्तूपांची नासधूस केली व बौद्ध धर्मियांना मिळणाऱ्या सवलती बंद केल्या. अनेक ग्रीकांच्या वसाहतींवर आक्रमणे करून त्याने त्यांना हूसकून लावले. पुष्यमित्रच्या पुढील पिढ्यांनी पुष्यमित्रच्या अनेक कुकर्मांची भरपाई करून धार्मिक शांतता टिकवून ठेवली.
मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत दक्षिण भारतातील मोठ्या भागावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ रोजी महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र शातकर्णी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू शालिवाहन शक आजही रूढ आहे.
याच काळात शक राज्यकर्त्यांनी पश्चिम भागावर नियंत्रण मिळवले होते. शक हे मूळचे मध्य अशियातील लोक होते.
लेबल: चंद्रगुप्त मौर्य, मौर्य साम्राज्य, सम्राट अशोक, exam, google, indian history, mpsc, shivaji maharaj, ssc, study, upsc, youtube