गुरुवार, 5 मार्च 2020

मौर्य साम्राज्य

मौर्य साम्राज्य:
अलेक्झांडरचे आक्रमण काळात मगधमध्ये नंद घराण्याची सत्ता होती. नंद वंशाच्या काळात मगधमध्ये असंतोष व राजकीय अस्थैर्य वाढले होती. चंद्रगुप्त मौर्यने मगध साम्राज्याचे शासक नंद घराण्याचा पराभव केला व इसपूर्व ३२१ मध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना केली. चंद्रगुप्तने अलेक्झांडरचा सेनापती सेक्युलस निकेटरचा पराभव करून ग्रीकांचे वर्चस्व संपुष्टात आणले. चंद्रगुप्त मौर्यने भारताचा मोठा भूभाग मौर्य साम्राज्याचा अधिपत्या खाली आणला, तो विस्तार बिन्दुसारच्या काळात चालू राहिला व सम्राट अशोकच्या काळात (इ.स.पूर्व २७३ ते २३२) त्या विस्ताराने कळस केला. जवळपास संपूर्ण भारत, पाकिस्तान, अफगणिस्तान, बांग्लादेश, इराण व ब्रम्हदेशाचा काही भाग इतका मोठ्या भूभाग मौर्य साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला होता. इस. २६० मध्ये झालेल्या कलिंगच्या युद्धात अशोकने कलिंग देश मौर्य साम्राज्याला जोडला परंतु झालेली मानवहानी पाहून त्याचे मन विरक्त झाले व त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला, तसेच त्याने बौद्ध धर्माच्या प्रसारकाचे काम हाती घेतले. बौद्ध धर्माचा जगभर प्रसार होण्यास अशोकाचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती. तर विदीशा, उज्जैन, तक्षशिला ही प्रमुख शहरे होती. अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या कानाकोपऱ्यात पहावयास मिळतात, तसेच अनेक स्तूप आजही पहायला मिळतात, सारनाथ येथील अशोकस्तंभ आज आधुनिक भारताची राजमुद्रा बनली आहे. सम्राट अशोकानंतर मौर्य साम्राज्य हळूहळू क्षीण होत गेले व अशोकानंतर ६० वर्षातच लयाला गेले. शेवटचा मौय सम्राट बृहद्त्त याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने वध केला व मौर्य साम्राज्याचा अंत झाला.

शुंग, शक आणि सातवाहन:
मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर उत्तर भारतावर शुंग वंश, पश्चिमेला शक राज्य् व दक्षिणेला सातवाहनांचे प्राबल्य होते. भारताच्या वायव्य प्रांत व अफगणिस्तानवर ग्रीक राज्य कर्त्यांनी पुन्हा वर्चस्व मिळवले परंतु कालांतराने ते भारतीय संस्कृतीत सरमिसळून गेले. मौर्य साम्राज्याचा शेवटचा सम्राट बृहदत्त याचा पुष्यमित्र शुंग ने वध केला व स्वता: सम्राट बनला, त्याच्या राज्यकालात त्याने मागील शतकात बौद्ध धर्माचे वाढलेले प्रस्थ कमी करण्याचा प्रयत्न केला व सनातन वैदिक धर्माला चालना दिली. त्याने अनेक बौद्ध स्तूपांची नासधूस केली व बौद्ध धर्मियांना मिळणाऱ्या सवलती बंद केल्या. अनेक ग्रीकांच्या वसाहतींवर आक्रमणे करून त्याने त्यांना हूसकून लावले. पुष्यमित्रच्या पुढील पिढ्यांनी पुष्यमित्रच्या अनेक कुकर्मांची भरपाई करून धार्मिक शांतता टिकवून ठेवली.

मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी ख्रि.पू २३०- २२५ पर्यंत दक्षिण भारतातील मोठ्या भागावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रूपांतरित झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ रोजी महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र शातकर्णी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू शालिवाहन शक आजही रूढ आहे.

याच काळात शक राज्यकर्त्यांनी पश्चिम भागावर नियंत्रण मिळवले होते. शक हे मूळचे मध्य अशियातील लोक होते.

लेबल: , , , , , , , , , , ,

१६ प्रमुख महाजनपदे

वैदिक काळाच्या शेवटच्या काळात ज्यांचा महाभारतात उल्लेख आहे अशी प्राचीन भारतातील राज्ये महाजनपदे म्हणून उदयास आली. यांचे वेदांमध्ये, बौद्ध व जैन धर्माच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख आढळतात. मगध,काशी, कोसल, अंग, मल्ल, चेदी, वत्स , कुरु पांचाल, मत्य, शूरसेन, आसक, अवंती, गांधार, कंबोज अशी १६ प्रमुख महाजनपदे साधारपणे इसपूर्व १००० ते ५०० च्या आसपास अस्तित्वात होती. यांचा विस्तार आधुनिक अफगणिस्तानपासून ते बंगालपर्यंत तर दक्षिणेकडे महाराष्ट्रपर्यंत होता व सर्व प्रमुख महाजनपदे ही गंगा नदीच्या खोऱ्यात होती. सिंधू संस्कृती नंतरचे मोठे नागरी करण या काळात झाले.

या महाजपदांहून वेगळे अशी अनेक लहान सहान राज्ये भारतीय उपखंडात सर्वत्र पसरली होती. बहुतांशी त्यांचे अधिपत्य वांशिक असे तर काही वेळा निवडीप्रमाणे असे. शिकण्याची प्रमुख भाषा संस्कृत होती तर बोलीभाषा अनेक असण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात प्राकृत ही प्रमुख बोली भाषा बोलली जात होती. मराठी व हिंदी भाषांचे मूळ प्राकृत भाषेत असण्याची शक्यता आहे. लहान सहान राज्ये व जनपदे ही चार प्रमुख महाजनपदांच्या अधिपत्याखाली होती. ती म्हणजे कोसल, अवंती,मगध व वत्स.

वैदिक काळात हिंदू धर्म असा अस्तित्वात नव्हता, वैदिक पूजा- पाठ पद्धतींवर पुजारी वर्गाचे वर्चस्व होते. महाजनपदांच्या काळात भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा हिस्सा असणाऱ्या तत्त्वज्ञानाचा विकास झाला, उपनिषदे व इतर वेदोत्तर साहित्यामधून त्याकाळी आलेले प्रचंड मोठे वैचारिक बदल दर्शावतात. द्वैत अद्वैतवाद्, तसेच नास्तिकवाद, पदार्थवाद, अजिविकवाद इत्यादी मतप्रवाह त्याकाळी अस्तित्वात होते, जैन धर्म व बौद्ध धर्माची तात्त्विक बांधणी याच सर्व तत्कालीन ऊहापोहाचा निकाल आहे असे मानतात. हे भारताचे वैचारिक सुवर्णयुग होते असे मानतात.

गौतम बुद्धांना इसपूर्व ५३७ मध्ये आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाला व ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. याच सुमारास जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांनाही महानिर्वाण स्थिती प्राप्त झाली. बौद्ध धर्माची व जैन धर्माची सुरुवात झाली. जैन धर्मियांच्या श्रद्धे प्रमाणे त्यांचीही परंपरा जुनी आहे. वेदांमध्येही काही जैन तीर्थंकरांचा संदर्भ आढळतो.

बुद्ध धर्माची व जैन धर्माच्या शिकवणीत जी साध्या व विरक्त राहणीची शिकवण होती ती जनसामान्यांमध्ये लवकर पसरली. तसेच त्याचा उलटा प्रभाव वैदिक परंपरांवरही पडला, शाकाहार, अहिंसा हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचा भाग बनले. जैन धर्माचा प्रभाव भारतापुरतेच मर्यादित राहिला तर बौद्ध भिक्कूंनी बौद्ध धर्म भारताबाहेरही पसरवण्यास मदत केली.
१६ महाजन पदे

लेबल: , , , , , , , , , , , , , , ,

वैदिककाळ

वेद हे आर्य धर्माच्या मूलस्थानी आहेत.वेद हे अनादी आहेत म्हणजे काय या प्रश्नाची चर्चा आधुनिक कालखंडात सुरू झाली.विशेषत: वेदांच्या अभ्यासाकडे जेंव्हा पाश्चात्य लोकांना आपले लक्ष वळविले तेंव्हा इतर गोष्टींच्या बरोबरच त्यांनी वेदांच्या कालनिर्णयाकडे चर्चा सुरू केली.
ख्रिस्ती शकापूर्वी १००० वर्षाच्या पलीकडच्या काळात वेदरूपी काव्ये रचली असावीत असे दिसते. वैदिक साहित्य भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचे मानले जाते. वैदिक साहित्याची भाषा संस्कृत आहे. चार वेद म्हणजे वैदिक साहित्याचा मूळ गाभा आहे. या वेदान्च्या ग्रथाना 'सन्हिता' असे म्हणतात.'विद्' म्हणजे जाणणे आणि 'वेद' म्हणजे 'ज्ञान' असा अर्थ आहे. वेद मौखिक परम्परेने जतन केले गेले.

नालंदा विद्यापीठ

लेबल: , , , , , , , , , , , , , ,

प्राचीन सिंधु संस्कृती


सिंधु संस्कृती ही भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आहे. ही संस्कृति प्रामुख्याने सिंधू नदी,सरस्वती नदी व सिंधूच्या उपनद्याकाठी (पंजाबातील ५ मुख्य नद्यांच्याकाठी) अस्तित्वात होती. तसेच गंगा यमुना खोरे ते उत्तर अफगणिस्तानपर्यंत ही संस्कृती बहरली. सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी इ.स.१९२१ मध्ये प्रकाशात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले, त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरूप स्पष्ट झाले.राखालदास बॅनर्जी यांनी इ.स. १९२२ मध्ये मोहें-जो-दडोचा शोध लावला. यानंतर या दोन्ही स्थळी सर जॉन मार्शल (पुरातत्त्वविभागाचे महासंचालक,इ.स. १९०२ ते १९२८), इ. जे. एच्. मॅके, माधोस्वरूप वत्स, सर मॉर्टिमर व्हीलर इ. संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली.याशिवाय सर्वेक्षणातील पाहणीत सिंध-पंजाबात (विद्यमान पाकिस्तान) सिंधू संस्कृतीची अनेक प्राचीन स्थळे प्रकाशात आली. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे आगार असल्याने तिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले.
सिंधू संस्कृती आधुनिक भारत (पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात व पाकिस्तानातील पंजाब, सिंध, बलुचिस्तान व वायव्य प्रांत) भूभागावर वसलेली होती. त्यातील बराचसा भाग आधुनिक पाकिस्तानात असला तरी सिंधू संस्कृतीत आजच्या भारतीय संस्कृतीची पाळेमुळे सापडतात व भारताच्या इतिहासाचा अविभाज्य अंग आहे. ही संस्कृती प्राचीन इजिप्त व इराकमधील मेझोपोटेमिया या संस्कृतीं इतकी जुनी आहे. सिंधू संस्कृतीतील रहिवाश्यांनी धातूंचा वापर सुरू केला. मोहंदोजरो, हराप्पा येथे उत्खनात सापडलेल्या शहरांवरून सिंधू संस्कृतीची ओळख मिळते.
सिंधु संस्कृती व वैदिक संस्कृती हे एकच होती का यावर तज्ञांमध्ये वाद आहेत. नंतर आलेल्या वैदिक आर्यांनी सिंधू संस्कृतीवर आक्रमण केले व कालांतराने नष्ट झाली. असा एक मतप्रवाह आहे जो आजवर ग्राह्य धरण्यात आला होता. तर सिंधू संस्कृती व वैदिक संस्कृती एकच होती व सिंधू संस्कृतीवर कोणत्याही प्रकारची बाह्य आक्रमणे झाली नाहीत. परंतु कालांतराने बदलली व जी शहरे नष्ट झाली ती प्रामुख्याने हवामानातील बदल, नद्यांच्या पात्रातील बदल व मोठेमोठे पूर यांनी नष्ट झाली. वैदिक संस्कृती संदर्भात खूप साहित्य आहे परंतु पुरातत्त्वीय पुरावे नाहीत व सिंधू संस्कृतीबद्दल भरपूर पुरातत्त्वीय पुरावे आहेत परंतु त्या संदर्भात कोणतेही साहित्य नाही.

लेबल: , , , , , , , , , , , ,